गुरुजींच्या आठवणी
गुरुजी, किवा बापूंच्या आठवणी आता मी सुचतील तश्या लिहून काढणार आहे. हे वाक्य सूज्ञपणे सुरुवातीलाच घालून ठेवलं की नंतर येणारा विस्कळितपणाचा दोष आपोआप टळतो. आमच्या वर्गात एक मुलगा होता, त्याला कोणी त्याचे दोष दाखवायला लागला, की तो लगेच म्हणायचा, “मी मूर्ख, पुढे बोल”. त्याच धर्तीवर मी आधीच म्हणतो की आठवणी विस्कळीतच आहेत J
माझी अगदी पहिली आठवण म्हणजे जेव्हा मी क्लासला सुरुवात केली तेव्हा. गुरुजींनी माझ्या समोर एक कागद ठेवला. त्यावर रियाझ किती करावा, कसा करावा आणि त्याची तयारी नसेल तर क्लासला येण्यात काही अर्थ नाही असं लिहिलेलं होत. मी जोरात हो म्हणालो आणि आमचा क्लास चालू झाला. तरुण वयात माणूस काहीही कबूल करतो. पण आता असं वाटत की तसा रियाझ खरोखरच केला असता तर किती बर झालं असत!
मी सुरुवातीला गाण शिकत होतो. पण लवकरच गुरुजींनी मला पटवून दिल की गाण्यापेक्षा मी पेटी शिकावी. माझ्या आवाजाला तेव्हाही रेंज नव्हती आणि आताही नाही. पण महत्वाची गोष्ट ही की त्यांनी पटवून दिल. पहिल्या गुरु पौर्णिमेला मी देस वाजवला होता. आणि बहुधा मालपेकर किवा रानडे साथीला होते.
मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा गुरु पौर्णिमेचे तीन कार्यक्रम व्ह्यायचे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुजी स्वतः गायचे, नंतर एका शनिवारी बेडेकर विद्या मंदिरात junior लोकांचा, आणि पुढच्या शनिवारी ब्राह्मण सेवा संघात senior लोकांचा. नंतर दोन्ही ब्राह्मण सेवा संघातच होऊ लागले. दोन्ही सत्राचा समारोप मात्र गुरुजी स्वतः थोडं गाऊन करत असत. अश्याच एका उत्सवात वासूदेव जोशींचं उत्तम गाणं झाल्यावर शेवटी गुरुजींनी म्हटलेली बंदिश (भव तरो, भव तरो, हरीसुमर) माझ्या अजून लक्षात आहे. हलका पाउस पडत होता. पहात जेमतेम झाली होती. आणि ती बंदिश!
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना नेहमी उशीर होत असे. ९.३० चा कार्यक्रम १० शिवाय चालू होत नसे. एका वर्षी मात्र गुरुजींनी आधीच जाहीर केलं की कोणी नसेल तर ९.३० वाजता मी तंबोरा घेउन गायला सुरुवात करणार. तेव्हापासून मात्र सर्व गोष्टी वेळेवर सुरु व्हायला लागल्या.
आता जुन्या आठवणींना उजाळा देतोच आहे तर Titvala च्या मंदिरात होणारा रात्रभराचा कार्यक्रम कोण विसरेल? त्या कार्यक्रमाच्या वेळेला रानड्यांच्या ओळखीमुळे गार्ड किंवा ड्रायव्हर च्या डब्यातून जाता यायचं. आणि आता सांगतोच आहे तर आंबिवली जोशी प्रकरण सांगायलाच पाहिजे. अरुण जोशी कधीही आम्बिवालीला राहिले नाहीत. मग त्यांना आंबिवली जोशी नाव का पडलं? कारण एका वर्षी साहेब चुकून आम्बिवलीलाच उतरले. बघता बघता गाडी सुटली, आणि जोशिसाहेबांनी चपळाई करून (म्हणजे काय ते त्यांनाच विचारा!) गाडी पकडायचा प्रयत्न (?) केला. नंतर गार्डच्या डब्यात बसलेल्या आम्हाला पण हातवारे करून बघितले. पण काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळा अर्थातच सेल फोन नव्हते. साहेब १ १/२ तास नंतरची गाडी पकडून अवतीर्ण झाले!
मी एक गोष्ट सांगता सांगता कुठे भरकटलो!
आता गुरुजींच्या शिकवण्याबद्दल. ते नेहमी म्हणायचे की गाण्याला हेतू पाहिजे. तुम्हाला काय सांगायचं आहे ते आधी ठरवा. निर्हेतुक गाण्याला ते पेशावरी गाण म्हणायचे. पेशावर चा काही संबंध नाही, पण “पेशा” चा आहे. विलंबित ठेक्यामध्ये विस्ताराचे तीन भाग करून कसं गायचं किंवा वाजवायचं हे मला अजूनही स्पष्ट आठवत.
कौस्तुभ रागामाधली गत हे रचनाशक्तीच उत्तम उदाहरण आहे. माझं नशीब इतकं चांगलं की ही गत माझ्यासमोर झाली. हा राग पण नवीन आहे, काहीसा झिंझोटीच्या अगाने जाणारा, तरी वेगळा. आणि पाचव्या मात्रेवर चालू होणारी गत. शिवाय मुखडा असा की इतर मात्रांवारूनही उठता येईल असा. आणि स्थायीच्या बाकीच्या ओळी तर अशा सुंदर बांधलेल्या, की तालाशी मजेदार खेळ करत करत मुखडा पुन्हा कधी उठतो ते समजताच नाही. अगदी मारव्याच्या चीजेसारखीच दुसरी आणि तिसरी ओळ (डमरू बाजी री). जेव्हा मी आणि विकासनी जुगलबंदी वाजवली तेव्हाचा त्यांचा चेहरा मी अजून विसरू शकत नाही. मी माझ्याकडे शिकणाऱ्या बऱ्याच विदयार्थ्यांना ही शिकवली आहे.
आता आपण काय करू शकतो? एक तर गुरुजीच्या बंदिशींच नेट वर दस्तऐवजीकरण करू शकतो. या लेखापेक्षा चांगले लेख लिहून नेटवर टाकू शकतो. विद्यार्थ्यांना उत्तम उत्तम बंदिशी शिकवू शकतो. आणि गुरुजींकडून प्रेरणा घेउन स्वतः बंदिशी रचू पण शकतो.
ज्याला जे जमेल त्यांनी ते करावं!