बापूंच्या आठवणी
आम्ही कोणीही नातवंडं त्यांना आजोबा कधी म्हणालो नाही. ते सगळ्यांचेच बापू होते. सावळी ,ठेंगणी ,हसरी आणि खूप मायाळू “ठाण्याची आजी” माझी फार आवडती होती , पण बापूंचा मात्र भीतीयुक्त दरारा असायचा . बापू मला आठवतात त्यांच्या गायनवर्गातल्या तक्क्याला टेकून एका डग्ग्यावर ताल धरणारे ,कधी सुपारी कातरत विद्यार्थ्याना नोटेशन सांगणारे , कधी वर्गात बसून शिकविलेले घोकणाऱ्याच्या चुकांना , आतल्या खोलीतूनच “हूं ” म्हणून सुधारणारे.
मी त्यांना खूप लहानपणापासून पाहीले आहे. ठाण्याला सरस्वती शाळेत पहिलीत असतांना माझा पाय एकदा प्लास्टरमध्ये होता , फरफटत घरभर सरपटून मी तो काळा मिचकूट करते म्हणून जशी ते माझी थट्टा करत , तसेच “जाशील बघ खाली मुलांबरोबर खेळायला महिन्याभरात” असे म्हणून डोक्यावर टपली मारत उदासीही घालवायचे.
त्यांना गाणे शिकवतांना बघायला मला फार आवडायचे. क्लासमधल्या काळ्या लाकडी कोचावर किंवा छोट्या ग्यालरीतल्या झुलत्या खुर्चीत बसून मी रंगात येऊन बेसूर गुणगुणायला लागल्यावर मला थांबवून “पट्टीत ” गा म्हणायचे. कधी कधी चक्क बाहेरील वाहनाने वाजविलेला हॉर्न पेटीवर वाजवून दाखवायचे. मी त्यांच्याकडे गाणे शिकण्याचा खरा प्रयत्न माझे कॉलेज संपतानाच्या काही वर्षात केला. माझ्यामध्ये नसलेल्या चिकाटीला कंटाळून कधीतरी त्यांनी मला शिकवणे थांबवले . खूपदा त्यांनी अतिशय चिकाटीने शिकणाऱ्या प्रकाश चिटणिसचे उदाहरण मला सांगितले आहे.
बाबा रिटायर होऊन पुण्याला गेल्यानंतरची माझी नोकरीची १० वर्षे मी बापूंकडे राहिले. हा सहवास खूप आनंददायी होता. त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे, दिलदारपणाचे, रसिकतेचे अनेक प्रसंग मी पहिले आहेत. शिस्तप्रीय तर ते होतेच होते ,वेळ चुकलेली त्यांना पसंत नसे , काटेकोरपणा असा कि सतरंजीचा कोन तिरपा झाला कि सरळ करायला सांगत . “आज बैठक सरोजने घातलेली दिसते” मी “हो बापू, काय झाले? ” विचारल्यावर ” तबल्याची हातोडी २ ईंच डावीकडे सरकलेली आहे ” म्हणायचे. क्लासचा लाकडी जिना पाय वाजवत चढलेला त्यांना आवडत नसे (त्यामुळे मी आलेली त्यांना अचूक कळे ). पहाटे ४ वाजता उठून ते त्यांचा पहिला चहा करीत पण आवाज होत नसे. ६ वाजताची पहिली शिकवणी असे, मग मला आत जाऊन झोप अशी सूटही देत, खूप मायाळू होते ते.
खाण्यापिण्याच्या बाबतीत चांगले चोखंदळ होते . मामलेदारांची मिसळ, गोखल्यांकडची भजी जशी आवडीने खायचे तशीच आजीच्या हातची मटार उसळ, चकल्या ,वड्यांची ची तारीफ करीत सगळ्यांना खिलवायचे.
खूप हरहुन्नरी होते, गायचे, पेटी वाजवायचे, नाटके बसवायचे,गोष्टी सांगायचे, कीर्तन करायचे. सुरुवातीला त्यांनी अनेक व्यवसाय केले, दुधाचा रतीब घातला, हिशेबनीसांचे काम केले, गाद्या बनवण्याचं धंदा केला ,शिकवण्या घेतल्या, ऑडिटचे कामही केले , पण ते रमले मात्र गाण्यात आणि ते शिकवण्यात. नवीन नवीन बंदिशी सुचत असताना मी त्यांना घरात एकाग्रतेने येरझारा घालत रचना करताना पहिले आहे. सुरांबरोबरच शदांच्या अर्थाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले . काहीवेळा उर्दू शब्दयोजना करताना त्यांनी चक्क मलादेखील अर्थ विचारून खात्री करून घेतली आहे . त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे फटके मीदेखील खाल्ले आहेत, पण त्यामुळे अंतर्मुख होऊन चूक सुधारण्याची संधी मिळते हे मला जाणवले आहे.
बापूंची तीन वैषिष्ट्ये मला आवर्जून सांगावीशी वाटतात . १- त्यांनी केलेल्या सुरेल,लयदार,अनवट तरीही अर्थपूर्ण रागरचना, २- विद्यार्थ्यांचे गुणदोष हेरून त्यानुसार शिकवण्याची त्यांची हातोटी, ३- संगीताचा आनंद घेण्याची वृत्ती – जी त्यांनी आपल्या शिष्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवली.
कोणत्याही कौशल्याची परिसीमा म्हणजे नवनिर्मिती. ती त्यांच्या अनेक बंदिशींतून आणि मयूरबिहाग, कौस्तुभ यासारख्या नवीन रागनिर्मितीतून दिसली आहे. हि नवनिर्माणाची प्रेरणा त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिली . त्यांचे प्रिय शिष्य श्री. वासुदेवराव जोशी यांनी उत्तम बंदिशी बांधून याचा प्रत्यय दिला आहे. अगणित विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले , सगळेच जरी पट्टीचे गायक ,वादक झाले नाहीत तरी गाण्याचा आस्वाद घेण्याची मधुकर वृत्ती त्यांच्यात आली ती बापुंमुळेच.
या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी पुन्हा उजळण्याची हि संधी खूप छान होती, ती दिल्याबद्दल विद्यार्थीमंडळाचे धन्यवाद.
सरोज दातार-आपटे
मुंबई – १९/१२/२०१५